Categories
कथा गोंडस - एक दिवस

गोंडस – एक दिवस – भाग १

प्रिये बंगई वर बसली होती आणि तिथून विजय ला म्हणाली

अरे विजय… किती वेळ झाला अजून चहा उकळतोय कि नाही तुझा?

विजय (किचन मधून)

अरे हो हो.. किती घाई. जेव्हा मी घाई करत होतो तेव्हा कशी बोलायची? काही दम धीर आहे कि नाही तुझ्यात. चहा नीट उकळावा लागतो तेव्हाच माझ्या विजयला आवडतो आणि तो फ्रेश होऊन जोरात कामाला लागतो.
तेव्हाही काम करत होतो आजही काम करतोय. आता तर अजून काम वाढलंय.

प्रिये

ए चिडचिड्या, मी नव्हतं सांगितलं तुला, तू स्वतःहून बोलला मी करतो आपल्यासाठी चहा

विजय चहाचे दोन कप घेऊन बाहेर आला आणि हसत म्हणाला

हा हा हा हा… अगं. हो हो, गम्मत करतोय मी. आज पर्यंत तू सुखी राहावीस म्हणून प्रयत्न केलेत मी. आणि यापुढेही करत राहीन. फक्त थोडी जाणीव करून द्यायची होती, कि वेळ लागल्यावर धीर धरायला कोणी सांगितलं कि काय वाटत. हा हा हा हा.

प्रिये कुत्सिकपणे हसत

हे हे. छान हो. कळलं मला.

ए जाऊदे ना विजय. ये लवकर, बस माझ्या बाजूला.
बघ ना किती सुंदर दिसतंय सगळं, कित्ती छान वाटतंय.

चहा चा एक घोट घेत प्रिया बोलली, तोवर विजय तिच्या बाजूला बसला.
प्रियेने हळूच त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं.

बघ ना विजय, किती सुंदर आहे सगळं.
सूर्य अगदी डोळ्यासमोर. अगदी ताजी ताजी किरणं अंगावर येतायेत. संथ लाटा येतायेत किनाऱ्यावर, वाराही गार आहे. खुश शुद्ध वातावरण आहे. इतका ऑक्सिजन कधी आयुष्यात घेतला नाही आपण. इतकी मोकळी हवा कधीच नशिबात नव्हती आपल्या. मनावर कसलाच ताण नाहीये.
खरं सांगू? ऊर्जा सळसळते आहे निसर्ग आणि माझ्यात काहीच भेद वाटत नाहीये. सूर्याची सोनेरी किरण, सोनेरी किनारा, आकाशातली नारंगी छटा.
एखादा सिनेमा पाहणं आणि सत्यात पाहणं, खूप फरक आहे नाही?

विजय शांतपणे ऐकत होता त्याचे डोळे थोडे पाणावले होते

हो. खरं बोलतेस तू.

प्रियेचं लक्ष गेलं आणि बोलली

अरे विजय, काय झालं रे? इतकं छान वाटतंय सांगतेय मी आणि रडतोस काय?

विजय

ए.. मी काही रडत नाहीये, थोडं पाणी आलं.
बरं ते जाऊदे, तू सांग मला.
तुला आवडलं ना हे सगळं?

विजयला खरं तर त्याच्या मेहनतीचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं. आजवर प्रियेने त्याच्या आयुष्यात त्याला जी साथ दिली होती, त्याच्या बरोबर उभी होती, सर्व गोष्टींचा सामना करत होती, त्याच्यावर विश्वास ठेऊन होती, त्याला जे प्रेम तिच्याकडून मिळालं, त्या सर्वा-सर्वांचं मिळून तिला काहीतरी खूप छान त्याला द्यायचं होतं. आणि ते दिल्यावर तिला आवडलं, ह्यापेक्षा गोंडस दिवस काय असावा आयष्यात?

प्रिये लाडात त्याला बोलली

विजय तुला एक सांगू?

विजय म्हणाला

बोल ना प्रिये.

प्रिये

तू माझ्याकडे असं एकटक पाहत राहिलास तर तुझ्या ऊर्जेने तो चहा पुन्हा गरम होणार नाहीये. तो गार होतोय, नंतर पिल्या जाणार नाही.

दोघेही खळाळून हसू लागले.