दोघांचा चहा पिऊन झाला होता. दोन्ही कप बंगईवर त्या दोघांबरोबर झुलत होते. दोघांपैकी कोणीही उठायला तयार नव्हते. कारण हे सुख सोडणं कोणालाच मंजूर नव्हतं. काही वेळ दोघेही फक्त वातावरणाचा अनुभव घेत होते.
प्रिये म्हणाली
आज माझ्या जागी इथे मिनी असती तर?
विजय
मिनी?
प्रिये
आता उगाच भोळेपणाचा आव आणु नकोस.
मी माझ्या डोळ्यांनी तिला फुले देताना पाहिलंय तुला.
विजय
ती? तुझी मैत्रीण मिनी? अगं काय हे? मी तेव्हाच सांगितलं होतं तुला, मी ते फुलं तुझ्यासाठी आणले होते. आणि आपल्या कॉलेज काळात इतकं सहज कोणी कोणाला फुलं देत नव्हतं. म्हणून तुझ्या मैत्रिणी कडून तुला द्यायचे होते. पण तिने काही ऐकलंच नाही माझं.
प्रिये हसत म्हणाली
हा हा हा हा. हो रे विजय, आपला काळ तसाच होता. पण खरं सांगते तेव्हा माझा खूप जळफळाट झाला होता. मला खरंच वाटलं कि तू तिला फुलं दिलेत. मी खूप रडले होते त्या दिवशी. आपल्या कॉलेज चा पहिलाच रोज डे आणि तू तिला फुलं दिली आणि तेही एकट्यात. मी तर पाहिलं होतं माझ्या डोळ्यांनी पण आणखी काही जणांनी पाहिलं आणि बातमी वाऱ्यासारखी पसरली.
विजय थोडा चिंताग्रस्त होऊन
हो पण मला खरंच काही कल्पना नव्हती कि ती तुला ते फुलं कधीच देणार नाही, मला वाटलं ती आपल्या दोघांतली चांगली मैत्रीण म्हणून मदत करेन.
प्रिये मधेच थांबवून म्हणाली
हो. केली ना तिने मदत… स्वतःची.
माझी फुलं घेऊन गेली ती सटवी.
प्रिये रागाने लालबुंद झाली होती
विजय तिला शांत करत म्हणाला
प्रिये अगं.. मी त्यानंतर किती वेळा आणून दिलेत तुला फुलं..
आणि इतकी जुनी गोष्ट कुठे काढतेस तू? किती छान मूड होता तुझा.
प्रिये
तुला नाही कळणार रे विजय, ह्या मुलींच्या गोष्टी आहेत. ती पहिली वेळ होती. मी वाट पाहत होते, स्वप्न पाहत होते कि मला तू फुलं देशील, आणि तेच स्वप्न तिने चोरलं. तिने त्यानंतरही अफवांवर तुला वळवण्याचा प्रयत्न केला. तुला एक प्रकारे इमोशनल ब्लॅकमेल करत होती ती.
विजय
हो. खरंय हे प्रिये. एक दबाव बनवत होती ती. मला अजिबात अपेक्षित नव्हतं हे सगळं आणि आवडतहि नव्हतं.
विजय प्रियेच्या डोळ्यात डोळे घालून बोलू लागला
माझ्या मनात खरंच काही पाप नव्हतं. आणि झाल्या प्रकाराबद्दल मी तेव्हाही आणि आताही माफी मागतो.
प्रिये
अरे विजय, तू का माफी मागतोस. मी तुला तेव्हाच ओळखलं होतं कि तू खूप निर्भीड आणि खऱ्या मनाचा आहेस. तोच गुण पाहून मी तुला हो म्हटले होते.
लग्नासाठी…
हाहाहाहा..
विजय
अंग, हसतेस काय? मी आयुष्याचा साथीदार म्हणून तुझ्याकडे पाहत होतो. मग लग्नाचीच मागणी घालणार ना. आणि ते फिरून फिरून गेल्याने काय होतं पाहून झालं होतं, मिनीच्या प्रकरणात. मी तुला नेहमीसाठी हरवून बसतोय कि काय अशी भीती होती माझ्यात.
प्रिये हसत
हो रे. कळत होतं मला. खरं तर त्या एका वाक्याने माझ्यात विश्वास जागवला की तू खरा आहेस. आणि मी तुला हो म्हटले.
माझ्याशी लग्न कर. माझ्या इतकं सुखात तुला कोणीच ठेऊ शकणार नाही, आज गरीब आहे पण हवं ते करेन तुला सुखी ठेवायला. एक दिवस आपण एक होऊ.
किती गोंडस पणे म्हटलं होतंस तू ..
दोघांना हसू आवरेनासे झाले
जुन्या आठवणीत हरवून गेले होते.
विजय
किती निरागस होतो आपण.