Categories
कथा गोंडस - एक दिवस

गोंडस – एक दिवस – भाग ४

दोघेही स्वयंपाकघरात आले. प्रिये एका ठिकाणी उभी राहून स्वयंपाक करत होती, आणि विजय तिला जे जे काही हवं ते तिच्या जवळ आणून देत होता.
स्वयंपाक करता करता दोघेही अंताक्षरी खेळू लागले.

विजय

तुझ्या डोळ्यांत माझं मन दिसतंय,
माझ्या डोळ्यांत तुझं मन हसतंय,
थोडं हास्यामधुन थोडं स्पर्शामधुन,
शब्दावाचुन सारं उमगतंय

प्रिये

येशील ना
आठव तुझी, दाटे मनी
हूरहूर ती, हृदयातही
डोळे तुझ्या, वाटेवरी
येशील ना, शिणले जरी..
स्मरते मला अजुनि,

भेट आपुली,
भेट कोवळी ती,
पावसातली…

अंग अंग चिंब ओले,
जीव धुंदले,
धडधड उरात दोन्ही,
श्वास रोखुनि..

तू श्वास रे, होऊन जिवा
येशील ना, माझ्या उरी
डोळे तुझ्या, वाटेवरी
येशील ना, शिणले जरी

विजय

रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना, बनात ये ना जवळ घे ना, चंदेरी चाहूल लावीत प्रीतीत ये ना, प्रीतीत ये ना जवळ घे ना

प्रिये

आ !!!!!

विजय

सांग कधी कळणार तुला, भाव माझ्या मनातला….

प्रिये विजयच्या खांद्यावर चापटा मारत म्हणाली

चांगलं कळतंय मला तुझ्या मनात काय आहे ते

दोघेही त्यांच्या बागेतल्या श्याक वर सगळं जेवण घेऊन आले. विजय ने आणि प्रिये ने जे स्वप्न पाहिले होते तसे छानसे श्याक मध्ये डायनिंग आणि चार खुर्च्या होत्या

प्रिये

अरे विजय, दोन खुर्च्या बस झाल्या असत्या आपल्या दोघांना

विजय

असू देत म्हटलं गरज लागलीच तर

प्रिये

म्हणजे तू इतकं जाड व्हायचं ठरवलंय की तुला एकट्याला दोन खुर्च्या लागतील?

विजय रागाने प्रिये कडे पाहू लागला

प्रिये

हाहाहाहा, अरे गम्मत करते रे मी, किती गोड लुक देतोस. अगदी कॉलेज चा विजय दिसतोय.

असं म्हणत प्रिये ने एक फ्लाईग किस दिला, आणि विजय एखाद्या नववधू सारखा लाजेने गुलाबी झाला.

विजय ने प्रिये ला बसण्यासाठी खुर्ची मागे घेतली

सांभाळून, स्क्रू एकदम ढिला केलास तर आदळशीन खुर्चीवर.

प्रिये

आता सवय झाली रे मला, आणि तू असताना कसली काळजी रे?

जवळ जवळ सात वर्षांपूर्वी अपघातात प्रियेचा एक पाय गेला आणि तिला कृत्रिम पाय लावावा लागला, तेव्हापासून विजय तिच्या प्रत्येक हालचालीत तिच्याबरोबर असतो

किती छान वाटतंय रे विजय. आपलं आख्ख आयुष्य मुंबईच्या बंदिस्त घरात गेलं. आणि आज आपण इतके मोकळे आहोत. इतक्या हवेशीर ठिकाणी जेवणाची चव अजून वाढलीये, भूक पण सपाटून लागलीये.

काय रे विजय, तू पण बोल काही, तुला काहीच वाटत नाही वेगळा?

विजय

तू अगदी तेच बोलतेस जे माझ्या मनात आहे. मी तुला आनंदात पाहूनच खुश आहे

प्रिये

हो,

हा आनंद द्विगुणित झाला असता.

प्रिये शांत झाली आणि थोडी गंभीर, थोडी दुःखी.

विजय

काय गं, काय झालं?

एकदम का गप्प झालीस, सांग कशाने आनंद द्विगुणित झाला असता?

प्रिये

नको राहूदे, नाही पटणार तुला

विजय

अगं, एकदा बोलून तर पहा

थोडा वेळ दोघेही शांत होते

प्रिये

जर ह्या दोन रिकाम्या खुर्च्यांवर स्वरूप आणि आपली होणारी सून बसली असती तर?

प्रियेचे डोळे पाणावले, ती एकटक शून्यात पाहत होती. तिच्या हातात असलेला घसही ती खायचा विसरली होती.

विजय उठला आणि त्याने प्रियेचं डोकं घट्ट त्याच्या छातीवर धरलं. प्रिये थोडी लाजली आणि मंद हसू लागली

विजय

प्रिये, आपण दोघांनी विचार करूनच त्याला जाऊ दिलं ना? त्याला त्याचं मोकळं उडू देऊ म्हटलो होतो, तो खरंच काहीतरी आहे, त्याला स्वतःची ओळख बनवू देऊ. आता कुठे त्याला त्याच्या कामासाठी पारितोषिक, प्रसिद्धी मिळू लागली आहे, आपण खुश असलं पाहिजे त्याच्या प्रगतीने.

प्रिये

तुला नाही कळणार रे आईचं मन

विजय

बरं, चल आवरून घेऊ आणि अराम करू